शेअर मार्केटमधील तोटा भरून काढण्यासाठी कार चोरी; राजस्थानमध्ये विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या आरोपीला पाठलाग करून अटक


१२ तासांत बावधन पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावत १४ लाखांची होंडा एलीवेट कार केली जप्त

पोलिस डायरीज नेटवर्क,

पुणे : शेअर मार्केटमध्ये झालेला तोटा भरून काढण्यासाठी मित्राची तब्बल १४ लाख रुपये किमतीची होंडा एलीवेट कार चोरी करून ती राजस्थानमध्ये विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या आरोपीला बावधन पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून शिरपूर, जि. धुळे येथे ताब्यात घेतले. पोलिसांनी चोरीची कारही जप्त केली आहे.

दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी प्रथम सोमेश्वरदास गुप्ता, रा. बावधन, पुणे यांनी त्यांची नवीन होंडा एलीवेट कार चोरी झाल्याची तक्रार बावधन पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार गुन्हा रजि. क्र. ५२२/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचा तपास करताना बावधन पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढला. चोरीची कार प्रथम वाघोली, त्यानंतर अहिल्यानगर, संभाजीनगर, चाळीसगाव मार्गे धुळ्याकडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तपास पथकाने तातडीने कारचा पाठलाग सुरू केला.

शिरपूर येथे आरोपी ताब्यात

पोलिसांनी शिरपूर, जि. धुळे येथे कार अडवून आरोपीला ताब्यात घेतले. त्याचे नाव रोहन सत्यनारायण सोमानी (वय २६), रा. वाघोली, पुणे; मूळ रा. भिलवाडा, राजस्थान असे असल्याचे समोर आले.

पोलिसांच्या तपासात आरोपीने शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्याचे सांगितले. झालेला तोटा भरून काढण्यासाठी त्याने वडील व इतरांकडून पैसे उसने घेतले होते. हे पैसे परत करण्यासाठी मित्र प्रथम गुप्ता यांची कार चोरी करून राजस्थानमध्ये नेऊन विक्री करण्याचा त्याचा प्रयत्न असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बावधन पोलिसांनी आरोपी व चोरीस गेलेली होंडा एलीवेट कार अवघ्या १२ तासांच्या आत ताब्यात घेत गुन्हा उघडकीस आणला. पुढील तपास पोलीस हवालदार फारुक मुल्ला करीत आहेत.

कारवाईतील पोलीस अधिकारी व कर्मचारी :

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशीकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव, सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली बावधन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) परवेज शिकलगार, पोलीस उपनिरीक्षक सारंग ठाकरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र काळे, तसेच तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांनी ही कारवाई केली.


1
कृपया पहा

'पोलिस डायरीज' या बातमीवर तुमचे मत मांडा.

हे देखील पहा...

error: Content is protected !!